राज्यातील वातावरणात सतत बदल बघायला मिळत आहे. तर आता पुढील दोन दिवस राज्यात पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे , नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान आज नागपूरमध्ये, पुणे शहरात देखील पावसाने हजेरी लावली. राज्यातील वातावरण सतत बदलताना दिसत आहे. हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदजानुसार १२ ते १५ जून दरम्यान राज्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असण्याची शक्यता आहे. आज सकाळी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तासाभरात एकूण ४७ मिलीमीटर पाऊस नागपूर शहरात झाला आहे.