RCB vs PBKS : काल (9 मे) आरसीबीने पंजाब किंग्सचा दारून पराभव केला. विराट कोहलीच्या 97 धावांशिवाय रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीनच्या झंझावाती खेळीसह गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर आरसीबीने पंजाब किंग्जचा 60 धावांनी पराभव केला. सोबतच आरसीबीने IPL-2024 च्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 7 गडी गमावून 241 धावा केल्या. तर पंजाबचा संघ 17 षटकांत 181 धावांत गडगडला.
दोन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. हा सामना जिंकून आरसीबीने स्वतःला शर्यतीत कायम ठेवले तर पंजाबच्या प्लेऑफच्या आशा संपल्या आहेत.
पंजाबने टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला होता. या वेळीही पंजाब हे काम करू शकेल, अशी आशा होती. रिले रुसो आणि जॉनी बेअरस्टो जोपर्यंत क्रीजवर होते तोपर्यंत ते धावा करत होते, पण हे दोघेही बाद होताच पंजाबचे फलंदाज एक एक करून बाद होऊ लागले. रुसोने 27 चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. तर बेअरस्टोने 16 चेंडूत 27 धावांची खेळी खेळली. शशांक सिंगने 37 आणि कर्णधार सॅम कुरनने 22 धावा केल्या.
आरसीबीकडून मोहम्मद सिराजने तीन बळी घेतले. स्वप्नील सिंग, लॉकी फर्ग्युसन, कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर आरसीबीने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली परंतु कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विल जॅक यांना लवकर गमावले. मात्र यानंतर कोहली आणि पाटीदार यांनी पदभार स्वीकारला. दोघांनी 76 धावांची भागीदारी केली. पाटीदारने 23 चेंडूत तीन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 55 धावा काढण्यात यश मिळवले. तर कॅमेरून ग्रीनने 27 चेंडूत 46 धावा केल्या. तर कोहली आणि ग्रीनमध्ये 92 धावांची भागीदारी झाली.