Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अरविंद केजरीवाल यांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यावेळी कोर्टाने निवडणूक प्रचारात कोणतेही बंधन नसल्याचं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जर आज संध्याकाळपर्यंत कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाली तर अरविंद केजरीवाल यांची आजच तुरुंगातून सुटका होऊ शकते. तसेच केजरीवालांना जामीन मिळाल्याचे वृत्त समजताच आम आदमी पक्षात जल्लोषाचे वातावरण आहे. कार्यकर्ते पक्ष कार्यालयात पोहोचून ‘केजरीवाल जिंदाबादच्या’ घोषणा देत आनंद साजरा करत आहेत. यासोबतच तुरुंगाचे कुलूप तोडून केजरीवालांची सुटका झाली, अशा घोषणाही दिल्या जात होत्या.
दरम्यान, अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडी कोठडीत आहेत. 21 मार्च रोजी त्यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तसेच आज अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सुप्रीम कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे अरविंद पुन्हा एकदा निवडणुकीच्या प्रचारात दिसण्याची शक्यता आहे.