जगात सध्या अनेक देशांमध्ये युद्ध सुरु आहे. रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. इस्त्राईल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहे. आता इराक, इराण यांच्यात देखील युद्धाचे ढग दिसून येत आहे. यामुळे जगात तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आहे का असे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान तुर्कीने उत्तर इराकमध्ये प्रतिबंधित कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (पीकेके) ला लक्ष्य करत हवाई हल्ले केले. या हल्ल्यात पीकेकेच्या १६ दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा तुर्कीने केला आहे.
पीकेके १९८४ पासून तुर्कीविरुद्ध बंड करत आले आहे. ज्याला तुर्की, संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियनने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. तुर्कस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, उत्तर इराकमधील हकुर्क, मेटिना आणि गारा भागात पीकेके दहशतवाद्यांना हवाई हल्ले करून उद्ध्वस्त करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी इराकच्या कुर्दिस्तान स्वायत्त प्रदेशाची राजधानी इरबिल आणि बगदादमधील अधिकाऱ्यांशी उत्तर इराकमध्ये पीकेकेच्या लढाऊंच्या उपस्थितीबद्दल बोलून बंदी घातलेल्या गटाच्या विरोधात बगदादचा पाठिंबा मागितला होता.