Ravi Rana : नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमदार रवी राणा यांच्या मुंबईतील घरात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रवी राणा यांच्या घरातून तब्बल 2 लाखांची रोकड पळवण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही चोरी रवी राणांच्या घरातील व्यक्तीनेच केली आहे, त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
रवी राणा यांच्या खार येथील फ्लॅटमधून ही चोरी करण्यात आली आहे. ही चोरी त्यांच्या घरातील नोकरानेच केली असून सध्या तो फरार झाला आहे. अर्जुन मुखिया असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवी राणांच्या फ्लॅटमध्ये अर्जुन मुखिया हा घरकाम करत होता. तर रवी राणा यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक संदीप ससे यांच्याकडे दोन लाख रूपये दिले होते. ही रक्कम ससे यांनी कपाटात ठेवली होती. तर अर्जुन मुखियाची त्या रकमेवर नजर पडली होती. त्यानंतर मार्चमध्ये अर्जुन ती दोन लाखांची रक्कम घेऊन होळीचे कारण सांगत गावाल गेला तो परतलाच नाही.
अर्जुन फरार झाल्यानंतर काही दिवसांनी ससे हे फ्लॅटमध्ये आले होते. मात्र तिथे त्यांना कपाटात ठवलेले पैसे सापडले नाहीत. त्यानंतर त्यांनी ही माहिती रवी राणा यांना दिली. नंतर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.