लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज
बिहारच्या मोतीहारी येथे प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी
अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. जेपी नड्डा यांनी मला राहुल गांधी
यांची शैक्षणिक पात्रता माहिती नसल्याचे म्हटले आहे. तसेच किमान त्यांनी संविधान
तरी वाचले पाहिजे, अशी टीका नड्डा यांनी केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या प्रचार सभेत संविधानाची प्रत
लोकांसमोर घेऊन येत आहेत. भाजपा २०२४
मध्ये केंद्रात सत्तेत आल्यास संविधान बदलणार आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला
आहे. प्रचार सभेत बोलताना जेपी नड्डा म्हणाले, ”राहुल गांधी
संविधानाची प्रत घेऊन फिरत आहेत. किमान ते वाचा तरी. धर्मावर आधारित आरक्षण असू
शकत नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदींनी म्हटले आहे, ‘जोपर्यंत ते जिवंत आहेत आणि भाजप पक्ष आहे तोपर्यंत दलित, आदिवासी
आणि इतरांच्या आरक्षणाला कोणीही हात घालू शकत नाही‘,” असे नड्डा
म्हणाले.
जेपी नड्डा यांनी बिहारच्या सभेत लालू
प्रसाद यांच्यावर देखील टीका केली आहे. नड्डा म्हणाले, ” लालू यादव यांनी
चारा खाल्ला की नाही खाल्ला? नोकरीच्या बदल्यात जमीन बळकावली की
नाही? ” जेपी नड्डा हे सध्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात एनडीएच्या उमेदवारांसाठी
प्रचार सभा घेत आहेत.