सध्या महाराष्ट्रात काही भागात पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. सध्या
राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. वळवाचा पाऊस देखील काही ठिकाणी सुरु आहे.
मात्र राज्यातील पाण्याचे दुर्भिक्ष वाढताना दिसत आहे. राज्यातील मराठवाड्यात
पाण्याची टंचाई वाढत आहे. मराठवाड्यामध्ये ७ जिल्ह्यांमध्ये १ हजार पेक्षा जास्त
टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तब्बल १ हजार ७०६ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
सध्या मराठवाड्यात अनेक गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
अनेक गावांमधील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. शेततळी कोरडी पडली आहेत. ग्रामीण
भागातील स्त्रियांना दूरवर पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. मराठवाड्यांमधील
धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सध्या
राज्यातील धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठी केवळ २३ टक्के उपलब्ध आहे. मागील
वर्षांच्या तुलनेत १२ टक्के पाणीसाठा कमी आहे.
केवळ मराठवाडाच नव्हे तर राज्यातील
अनेक धरणांमध्ये पाणीसाठा तळाशी पोचला आहे. त्यामुळे शेतीबरोबर पिण्याच्या
पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होण्याची शक्यता आहे. धरणसाठ्यातील पाणीसाठा कमी होत
असल्याने प्रशासन आणि सरकार कशाप्रकारे पाण्याचे नियोजन कसे करते हे महत्वाचे
ठरणार आहे.