लोकसभा निवडणुकांचे देशातले मतदानाचे ४ टप्पे पार पडले असून पाचवा टप्पा येत्या ४ दिवसात येऊ घातला आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते प्रचारात मग्न आहेत. भाजपने दिलेल्या घोषणेनुसार ‘अबकी बार चारसौ पार’ हे प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपचे स्टार प्रचारक मेहनत घेताना दिसत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि सर्वात मोठे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशमध्ये प्रचार करणार आहेत. पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशात चार ठिकाणी आयोजित भाजपच्या जाहीर सभांमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी सार्वत्रिक निवडणुकीत 400 पार करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रचार करून मतदारांकडून आशीर्वाद घेत आहेत. भाजपने आपल्या X हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा निवडणूक कार्यक्रम शेअर केला आहे.
आज पंतप्रधान मोदी सकाळी 11 वाजता लालगंज, दुपारी 12:30 वाजता जौनपूर, दुपारी 2 वाजता भदोही आणि सायंकाळी 4.45 वाजता प्रतापगडमध्ये एका विशाल जनसभेला संबोधित करतील.
तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज बिहारमध्ये दोन ठिकाणी जाहीर सभांना संबोधित करणार आहेत., शाह आज पहिल्यांदा सीतामढी लोकसभा मतदारसंघात प्रचार करणार आहेत. सीतामढी येथील गोएंका कॉलेज मैदानावर दुपारी साडेबारा वाजता ते पक्षाच्या जाहीर सभेला संबोधित करतील. येथून ते मधुबनी लोकसभा मतदारसंघात पोहोचतील. या मतदारसंघातील निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री शाह हे दुपारी दोन वाजता बिस्फी येथील राहिका प्राथमिक शाळेत भाजपच्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.