सध्या सतत येत असलेल्या पावसाने आज पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्रासह कोकणात अवकाळी हजेरी लावली आहे. राज्यात कुठे ऊन, तर कुठे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आलेला दिसून आला.
एप्रिल महिन्यात आलेलया अवकाळी पाऊस,गारपिटीने विदर्भातील शेती शिवारात असणारे पीक उद्ध्वस्त झाले होते.गारांच्या तडाख्याने टरबूज, डांगर तसचं इतर फळ, भाजीपाला, उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील डांगराचे पीक मातीमोल झाले असून शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
रत्नागिरी, चिपळूणमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाअसली तरी पावसाच्या आगमनाने उष्णतेने त्रस्त नागरिक सुखावला आहे, मात्र आंबा आणि भातशेतीचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आणि बागायतदार हवालदिल झाले आहेत.
रायगडच्या दक्षिण भाग असलेल्या माणगाव महाड पोलादपूर म्हसळा श्रीवर्धन हरिहरेश्वर परिसरात आज अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत कडक ऊन असताना अचानक रायगडच्या या भागात वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि अवकाळी पाऊस कोसळू लागला.