राज्यात गेले काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावलेली असून तो थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये, दरम्यान हवामान खात्याकडून आता राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनसाठी पोषक वातावरणनिर्मिती राज्यात होताना दिसत आहे. राज्यात सध्याच्या घडीला बहुतांश भागांमध्ये पूर्वमोसमी वारे वाहण्यास सुरुवात झाली असून, त्याच्या परिणामस्वरुप अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. तर, काही भागांमध्ये मात्र दुपारपर्यंत चांगलेच उन्हाचे चटके जाणवत आहेत.
पुढील 24 तासांमध्ये उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यताही आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. साधारण 40-50 किमी प्रतितास वेगानं वाहणाऱ्या या वाऱ्यांसोबत इथे हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस महाराष्ट्रात आणखी काही दिवस कायम राहणार असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 19 मे 2024 पर्यंत वादळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे.मराठवाडा विभागात 19 मे पर्यंत वादळी पाऊस बरसणार असा अंदाज देण्यात आला आहे. तर आज 17 मेला राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील सिंधुदुर्ग, अहमदनगरनगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच या 16 जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिलेला आहे.