सध्या संपूर्ण देशभरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एकिकडे अवकाळी पावसाचा फटका बसत असताना आता भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये 18 ते 20 मे दरम्यान तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. उष्णतेची लाट उत्तर भारत आणि बिहारच्या इतर भागांमध्ये पसरण्याची शक्यता आहे.
Heat Wave : आयएमडीचे महासंचालक एम महापात्रा यांनी सांगितले की, वायव्य भारतातील अँटी-चक्रीवादळामुळे गरम हवा जास्त प्रमाणात जमा होत आहे, ज्यामुळे पृष्ठभाग गरम होत आहे. ही उष्ण हवा उत्तर प्रदेश आणि बिहारकडे सरकण्याची शक्यता आहे, त्यामुळे कमालीची उष्णता किमान आठवडाभर वाढू शकते.
आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या कमकुवत प्रभावामुळे तीव्र उष्णता आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांमध्ये वायव्य भारत आणि गुजरातमध्ये तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.
आगामी उष्णतेच्या लाटेची तयारी करण्यासाठी, IMD ने 18, 19 आणि 20 मे रोजी हरियाणा, पंजाब आणि पश्चिम राजस्थानसाठी “ऑरेंज अलर्ट” जारी केला आहे. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांना उष्णतेशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.