IPL 2024 Playoffs : आयपीएल 2024 च्या सीझनच्या अंतिम फेरीसाठी तीन संघ ठरले आहेत. त्यामुळे आता फक्त चौथ्या संघाचे नाव निश्चित व्हायचे आहे. या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा केकेआर हा पहिला संघ ठरला आहे. कोलकाताने खेळलेल्या सामन्यांमध्ये 13 पैकी 9 सामने जिंकले आहेत, तर एक सामना पावसामुळे गमवावा लागला आणि अशा प्रकारे तो संघ 19 गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि या स्थितीत त्यांचे 21 गुण झाले आहेत.
राजस्थान रॉयल्स हा प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने 13 पैकी 8 सामने जिंकले असून त्यांना 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच राजस्थानने शेवटचा सामनाही जिंकल्यास त्यांचे 17 गुण होतील. तर सनरायझर्स हैदराबाद 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. हैदराबादने 13 पैकी 7 सामने जिंकले असून पाच गमावले आहेत तर एक सामना रद्द झाला आहे.
राजस्थानने जर शेवटचा सामना गमावला आणि सनरायझर्स हैदराबादने आपला शेवटचा सामना जिंकला तर हैदराबाद दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. तसेच आता चौथा संघ बनण्याची सर्वात मोठी स्पर्धा चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी यांच्यात असल्याचे दिसते. चेन्नई सुपर किंग्ज 13 सामन्यांत 7 विजय आणि 6 पराभवांसह 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे तर RCB 13 सामन्यांत 6 विजय आणि 7 पराभवांसह 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे आता या दोन्ही संघातील कोणता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्लेऑफच्या या शर्यतीमध्ये चेन्नई सुपर किंग्ज पुढे आहे. जर सीएसकेने आरसीबीविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तर ते सहज प्लेऑफमध्ये पोहोचतील. तर दुसरीकडे, प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीला केवळ सीएसकेला पराभूत करावे लागणार नाही तर मोठा विजयही मिळवावा लागेल.