मुंबईसह राज्यातील तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढलेला दिसून येत आहे. पुढील दोन ते तीन दिवस देखील उन्हाचा पारा जास्त राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. म्हणजेच अजून काही दिवस उष्णतेच्या तापमानापासून सुटका मिळणार नसल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मुंबईत उष्णतेबरोबरच आद्रता वाढण्याची शक्यता आहे. मुंबईचे कमाल तापमान ३९ अंश सेल्सियस वर पोहोचले आहे.
तर दुसरीकडे राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. त्यामुळे राज्यात संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवसांत कोकणसह मुंबई, ठाण्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नागपूरसह, विदर्भात पुन्हा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. तसेच यंदा मे महिन्याच्या अखेरीस मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर १९ तारखेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे.