RCB vs CSK : काल (18 मे) झालेल्या दमदार अशा सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सचा दारूण पराभव केला. IPL 2024 च्या 68 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) प्रवास 27 धावांनी पराभवाने संपला.
हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर सामनयात लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला 20 षटकांत 7 गडी गमावून 191 धावा करता आल्या. रचिन रवींद्रने 60 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजा 42 धावा करून नाबाद राहिला. तर धोनीने 13 चेंडूत 25 धावांची खेळी खेळली.
कर्णधार फाफ डू प्लेसिस (54) आणि इतर फलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी आयपीएल 2024 च्या 68 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जसमोर 219 धावांचे लक्ष्य ठेवले. आरसीबीने 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या.
प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीला कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली (47) यांनी 78 धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली. लाँग ऑनवर डॅरिल मिशेलकडे कोहलीला झेलबाद करून सॅन्टनरने ही भागीदारी मोडली. यानंतर रजत पाटीदार कर्णधाराला पाठिंबा देण्यासाठी आला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी करत संघाला 100 धावांच्या पुढे नेले. डु प्लेसिस विचित्र पद्धतीने धावबाद झाला.
यानंतर रजत पाटीदार (41) आणि कॅमेरून ग्रीन (38*) यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगल्या स्थितीत नेले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. पाटीदारला डॅरिल मिशेलकरवी झेलबाद करून ठाकूरने ही भागीदारी तोडली. यानंतर दिनेश कार्तिक (14) आणि ग्लेन मॅक्सवेल (16) यांनी अतिशय उपयुक्त खेळी खेळून संघाला 200 धावांच्या पुढे नेले.