Mumbai Bomb Threat : 20 मे रोजी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये मुंबई परिसरातील 6 जागांवर मतदान होणार आहे. एकिकडे मतदानाची तयारी सुरू असताना दुसरीकडे आज सकाळी मुंबईत एक खळबळजनक प्रकार घडला आहे. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला आज एक फोन आला होता ज्यामध्ये मुंबईतील दादर परिसरात असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचं सांगण्यात आलं.
पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं की, तो बसनं प्रवास करत होता तेव्हा त्याने दोन लोक दादरमधील मॅकडोनाल्ड उडवण्याबाबत बोलत असल्याचं ऐकलं.
पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी सतर्कता दाखवत संपूर्ण तपास केला. मात्र, तपासादरम्यान त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. तसेच सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.