Mallikarjun Kharge : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उद्या राज्यांमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. एकिकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसमध्ये धुसफूस निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या फोटोवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई लावल्याचं समोर आलं आहे.
पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या फोटोवर काळी शाई लावण्यात आली आहे. खरगे यांनी काँग्रेसचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष रंजन चौधरी यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे कार्यकर्ते खरगेंवर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.
कोलकातामधील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर अनेक बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांचे फोटो आहेत. तर आज काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरवरील खरगे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. सध्या खरगे आणि अधीर रंजन चौधरी यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. या पार्श्वभूमीवर खरगेंच्या फोटोला काळी शाई लावण्यात आलं असल्याचं म्हटलं जात आहे.
दोन नेत्यांमध्ये नेमंक वादाचं कारण काय?
इंडिया आघाडीतील सहभागाबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. इंडिया आघाडीचे सरकार बनल्यानंतर मी बाहेरून पाठिंबा देईन, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. तर त्यांच्या या वक्तव्यावर अधीर रंजन चौधरी यांनी शंका उपस्थित केली होती आणि ते म्हणाले होते की, आपण ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तर याबाबत मल्लिकार्जुन खरगेंना विचारण्यात आलं असता ते म्हणाले होते की, इंडिया आघाडीसोबत ममता बॅनर्जी आहेत. तसेच त्यांनी म्हटलं आहे की त्या सरकारमध्ये सहभागी होती. त्यामुळे अधीर रंजन चौधरी निर्णय घेणार नाहीत, निर्णय हायकमांड आणि मी घेईन. तसेच ज्यांची याला सहमती नसेल ते बाहेर जातील.
खरगेंनी केलेल्या या वक्तव्यानंतर पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. तसेच खरगेंच्या बॅनरला काळी शाई लावल्यानंतर ते बॅनर काँग्रेल कार्यालयाबाहेरून हटवण्यात आले आहेत.