Uddhav Thackeray : आज सकाळी सात वाजल्यापासून लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड, लडाख, ओडिशा, उत्तर प्रदेश या ठिकाणी मतदान होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये 13, पश्चिम बंगालमध्ये 7, बिहारमध्ये 5, जम्मू आणि काश्मीरमध्ये 1, लडाखमध्ये 1, झारखंडमध्ये 3 आणि ओडिशातील 5 जागांवर मतदान पार पडत आहे. तर महाराष्ट्रात मुंबईतील सहाच्या सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. तसेच ठाणे कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी अशा 13 लोकसभा मतदारसंघातहो मतदान पार पडत आहे.
आज सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली आहे. सर्वसामान्य जनतेसह अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. यामध्ये आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. “जुमलाबाजीला देश कंटाळला आहे, पैशाने मतं विकत घेता येत नाहीत”, असा खोचक टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच त्यांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहनही केले.