Pune Accident : काल (19 मे) पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एक मोठा अपघात घडला. एका भरधाव सुपरकारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरूण-तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर संबंधित परिसरातील लोकांनी आरोपी चालकास बेदम मारहाण केली. तसेच त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हाही दाखल केला.
या प्रकरणी आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यावा काही अटी-शर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपी चालकाला न्यायालयाने येरवडा वाहतूक विभागातील वाहतूक पोलिसांसोबत 15 दिवस काम करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच त्याला काही चकित करणाऱ्या शिक्षा देण्यात आल्या आहेत.
अल्पवयीन मुलाने अॅड. प्रशांत पाटील यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर बाल न्याय मंडळात सुनावणी झाली असून मुलाविरोधात कलम हे जामीनपात्र आहेत. तसेच आम्ही पोलिसांना तपासामध्ये सहाकार्य करण्यास तयार आहोत. आरोपी मुलगा न्यायालयाच्या तारखेला हजर राहील आणि तपासात सहकार्य करेल, असा युक्तिवाद अॅड. पाटील यांनी केला आहे. दोन्ही बाजूंता युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी मुलाचा जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयाने अल्पवयीन मुलाला दिलेल्या शिक्षेनुसार, त्याला वाहतूक जागृतीबाबतचे फलक रंगवावे लागणार आहेत. तसेच 15 दिवस येरवडा विभागातील पोलिसांसोबत वाहतूक नियोजनाचे काम करावे लागणार आहे. तर अपघातावर मुलाने 300 शब्दांना निबंध लिहावा आणि दारुचे व्यसन सोडण्यास मदत होईल, असे उपचार डॉक्टरांकडून घ्यावेत. सोबतच मानसोपचार तज्ञांचे समुपदेशन घेऊन त्याचा अहवाल न्यायालयात दाखल करावा, या अटींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.