राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी
दिल्ली पोलिसांनी आठवड्याभरानंतर मोठी कारवाई केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री
अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांच्यावर केलेल्या
कथित गैरवर्तन प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे. या
एसआयटीचे नेतुत्व अतिरिक्त DCP (उत्तर) अंजिता चेप्याला या करणार आहेत.
उल्लेखनीय आहे की १३ मे रोजी राज्यसभा
खासदार स्वाती मालीवाल या अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या
निवासस्थानी गेल्या होत्या. जिथे मुख्यमंत्र्यांचे पीए बिभव कुमार यांनी
त्यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याबाबत स्वाती मालीवाल यांनी ३ दिवसांनी
तक्रार दाखल केली. त्यानंतर १८ मे रोजी पोलिसांनी बिभव कुमारला अटक केली. १९ मे
रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी
सुनावली. आता या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.