काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे आता राहुल
गांधींची अडचण वाढण्याची शक्यता आहे. कारण राहुल गांधी यांच्याविरुद्ध एमपी एमएलए
कोर्टाने समन्स जारी केले आहेत. राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्याविरुद्ध
वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याप्रकरणी भाजपा कार्यकर्ता नवीन झा यांनी
रांचीच्या सिव्हिल कोर्टात तक्रार दाखल केली होती.
भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या
विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी रांचीचे एमपी एमएलए न्यायालयाचे विशेष
न्यायाधीश सार्थक शर्मा यांच्या न्यायालयाने काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष
राहुल गांधी यांना प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. लोकसभा
निवडणुकीमुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जून रोजी होणार आहे. राहुल गांधी
यांनी भाजपामध्ये खुनी अध्यक्ष होऊ शकतो पण काँग्रेसमध्ये असे होऊ शकत नाही,
असे
वक्तव्य केले होते.
राहुल गांधींच्या वतीने एमपी एमएलए
न्यायालयाने यापूर्वी जारी केलेल्या समन्सला झारखंड उच्च न्यायालयात आव्हान
देण्यात आले होते, ते उच्च न्यायालयाने फेटाळले होते. यानंतर एमपी एमएलए न्यायालयाने राहुल गांधींना पुन्हा एकदा समन्स
बजावले आहे. सुनावणीदरम्यान तक्रारदार नवीन झा यांचे वकील विनोद कुमार साहू आणि
अमरदीप साहू हजर झाले, अशी माहिती वकील विनोद कुमार साहू यांनी दिली.