Pune Porsche Accident : पुण्यात झालेल्या अपघाताने सध्या सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. रविवारी मध्यरात्री एका व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्श कारने एका तरूणी आणि तरूणीला धडक दिली होती, ज्यामध्ये त्या दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. कारण अपघातानंतर 5 तासांमध्येच अल्पवयीन मुलाला काही अटीशर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला होता. अशातच काल पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना छ. संभाजीनगरमधून अटक केली आहे.
या अपघात प्रकरणाने सोशल मीडियावर जोर धरल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणावर पुणे सीपी अमितेश कुमार म्हणाले की, FIR मध्ये पाच आरोपी होते त्यापैकी आम्ही 3 आरोपींना रात्री उशिरा अटक केली आहे. तर लवकरच आम्ही त्यांना न्यायालयात हजर करू.
जर बाल हक्क न्यायालयाने हिट अँड रन प्रकरणातल्या आरोपीला सज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी दिली तर त्याला पुणे पोलीस अटक करणार आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी वकिलांमार्फत आरोपीला नोटीस पाठवली आहे. जर आरोपी न्यायालयात हजर राहिला नाही तर त्याला फरार घोषित करण्याची कारवाई करणार असल्याचा उल्लेख नोटिशीत करण्यात आला आहे.
महत्त्वाचं म्हणजे मोटार वाहन कायद्यातील 185 च्या अंतर्गत आरोपीवर नव्याने गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता विशाल अग्रवालला आज दुपारी 2 वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.