KKR vs SRH : काल (21 मे) आयपीएल 2024 चा पहिला क्वालिफायर सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यातील विजयासह कोलकाता नाईट रायझर्स संघ चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे.
यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने 2012, 2014 आणि 2021 मध्ये अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. तर दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद संघ आता दुसरा क्वालिफायर सामना खेळणार आहे. जिथे त्यांचा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघाशी होईल.
दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना त्याने 19.3 षटकात 159 धावा केल्या आणि त्याचा संघ सर्वबाद झाला. पहिल्या डावात सनरायझर्स हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नाही आणि त्यांनी 5 षटकांत 39 धावांवर 4 विकेट गमावल्या.
यानंतर राहुल त्रिपाठी आणि हेनरिक क्लासेन यांच्यात पाचव्या विकेटसाठी भागीदारी झाली आणि दोघांनी मिळून 37 चेंडूत 62 धावा जोडल्या. यानंतर क्लासेन बाद झाला आणि त्यानंतर राहुल त्रिपाठीने अब्दुल समदसोबत भागीदारी करण्याचा प्रयत्न केला पण समदने राहुलला धावबाद केले आणि तो या सामन्यात 35 चेंडूत 55 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अखेरीस, संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने 24 चेंडूत 30 धावा जोडून सनरायझर्स हैदराबादला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.
कोलकाता नाईट रायडर्सकडून मिचेल स्टार्कने शानदार गोलंदाजी केली. त्याने पहिल्या तीन षटकांत सनरायझर्सच्या तीन आघाडीच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. स्टार्कने प्रथम ट्रॅव्हिस हेडला शून्यावर बाद केले. यानंतर त्यांनी नितीश रेड्डी यांना बाद केले. त्यानंतर सहाबाज अहमदही खाते न उघडता मिचेल स्टार्कचा बळी ठरला.