दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर स्वाती मालीवाल यांच्या प्रकरणावर आपले मौन तोडले आहे. आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदाराला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण केल्याच्या आरोपावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि न्याय हवा असल्याचे म्हटले आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अरविंद केजरीवाल म्हणाले, “हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे आणि स्वाती मालीवाल यांच्या वक्तव्याचा कारवाईवर परिणाम होऊ शकतो.”
“मला आशा आहे की या प्रकरणाचा योग्य तपास होईल. न्याय मिळाला पाहिजे. या घटनेबाबत दोन बाजू आहेत. पोलिसांनी दोन्ही पक्षांची योग्य चौकशी करून न्याय द्यावा”, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
दरम्यान, स्वाती मालीवाल यांनी आरोप केला आहे की, 13 मे रोजी सकाळी त्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी हजर होत्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांनी त्यांच्यावर हल्ला केला. मुख्यमंत्र्यांच्या ड्रॉईंग रूममध्ये आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी बिभव कुमारला अटक केली आहे. त्याचवेळी बिभव कुमारनेही पोलिसांकडे तक्रार दिली आणि सांगितले की, मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात जबरदस्तीने प्रवेश केला आणि थांबवल्यावर त्याने तिला धक्काबुक्की केली.
सध्या अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे.