Prashant Kishor : सध्या निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर चांगलेच चर्चेत आहेत. कारण त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत काही अशी विधाने केली आहेत ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. प्रशांत किशोर सध्या अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत आहे, ज्यामध्ये त्यांनी अनेक दावे केले आहेत. यामध्ये भाजप पुन्हा एकदा केंद्रात सत्ता काबीज करेल, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर विरोधक जोरदार टीका करत आहेत.
विरोधकांनी टीका केल्यानंतर प्रशांत किशोर यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, “पाणी पिणे हे खूप चांगले आहे, कारण ते मन आणि शरीर दोन्ही हायड्रेट ठेवते. तसेच या निवडणुकीच्या निकालाचे माझे मूल्यांकन पाहून ज्यांना आश्चर्य वाटते त्यांनी 4 जून रोजी भरपूर पाणी हातात ठेवावे.”
प्रशांत किशोर पुढे म्हणाले, मी केलेल्या दाव्याची खिल्ली उडवणाऱ्यांनी बंगालचा निकाल लक्षात ठेवावा. भाजप 2021 च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत तिहेरी आकडा गाठणार नाही, असा दावा प्रशांत यांनी केला होता. त्याचवेळी अनेक वाहिन्यांनी भाजपच्या विजयाचा दावा केला होता.
दरम्यान, प्रशांत किशोर हे एका मुलाखतीत हिमाचलमधील काँग्रेसच्या खराब निकालाबद्दल बोलले होते, यावर त्यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. यानंतर प्रशांत किशोर पाणी प्यायले होते, ज्यामुळे त्यांना खूप ट्रोल करण्यात आले होते. तर यावरून आता प्रशांत किशोर यांनी एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये चोख उत्तर दिले आहे.
भाजप या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल, असा दावा प्रशांत किशोर यांनी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. तसेच भाजपला पूर्वीइतक्याच किंवा त्याहून अधिक जागा मिळू शकतात, असंही प्रशांत किशोर म्हणाले.