पुण्यातील हायप्रोफाईल अपघात सध्या या तपासावरून पुणे पोलिसांवर आरोप करण्यात आले होते. आरोपीला पोलीस ठाण्यात स्पेशल ट्रीटमेंट दिली गेल्याचे आरोप करण्यात येत आहेत. दरम्यान या प्रकरणात आता पुणे पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. तपासात दिरंगाई केल्याबद्दल आणि माहिती वरिष्ठांना न दिल्याबद्दल पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात करण्यात आलेली प्रमुख कारवाई समजली जात आहे. हे दोन्ही कर्मचारी येरवडा पोलीस ठाण्यातील असल्याचे समजते आहे.
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या मोठ्या अपघातामुळे सगळीकडे संतापाचं वातावरण आहे. प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवाल याने पोर्शे कारने दोनजणांना मागून जोरात धडक दिली. या अपघातात एका तरूणाचा आणि तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान काल पुणे पोलिसांनी वेदांत अगरवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. आरोपी विशाल अग्रवाल याला आज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान न्यायालयाने त्याला २४ मे पर्यंत कोठडी सुनावली आहे. तर ज्या आरोपीने हा अपघात केला आहे, त्या आरोपीला १४ दिवस बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.