ऑस्ट्रेलिया देशाच्या जवळ बेटांचा देश असणार्या पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) येथील काओकलाम गावात झालेल्या काल भूस्खलनामध्ये (landslide ) १०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार राजधानी पोर्ट मोरेस्बीच्या वायव्येस सुमारे ६०० किलोमीटर अंतरावरील एंगा प्रांतातील काओकलम गावात शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास भूस्खलन झाले. त्यातील मृतांची संख्या ३०० पेक्षा जास्त असल्याची भीती आहे तर जवळपास ११०० घरे गाडली गेली आहेत. अद्याप बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा नेमका आकडा समजू शकलेला नाही.
पंतप्रधान जेम्स मॅरापे यांनी सांगितले की, अधिकारी अद्याप बचावकार्य करत आहेत आणि नेमकी माहिती हाती आल्यानंतर जीवितहानीचा आकडा जाहीर करतील. पण मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे घडल्यामुळे अनेक जण गाढ झोपेत होते. त्यामुळे बरेच जण जमिनी खाली गाडले गेले आहेत. अद्याप शोध मोहीम सुरू आहे.दरम्यान भूस्खलनामुळे काओकलाम गावातून शहराकडे जाणारा रस्ताही बंद झाला आहे.
भूस्खलनापूर्वी पापुआ न्यू गिनीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप फिन्शाफेनच्या वायव्येस 39 किलोमीटर अंतरावर झाला होता आणि रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.3 मोजली गेली.