लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. इंडिया आघाडीसह एनडीएचे स्टार प्रचारक देशभरात आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका प्रचारसभेला संबोधित करताना इंडिया आघाडीवर टीका केली आहे. इंडी आघाडीतील नेते हे सनातनविरोधी असल्याची टीका नड्डा यांनी केली आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत पराभूत करणे आवश्यक आहे.
बलिया लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार नीरज शेखर यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी जनाडी येथे आयोजित जाहीर सभेत नड्डा म्हणाले की, ”गेली १० वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेदभाव न करता सरकार चालवले. या इंडी आघाडीतील सर्वच कुटुंबावर आधारित पक्ष आहेत. ते सर्व भ्रष्ट आहेत. मोदी म्हणतात भ्रष्टाचार संपवा, ते म्हणतात भ्रष्टाचारी वाचवा. कोळशासह यूपीए सरकारच्या अनेक घोटाळ्यांचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, सोनिया आणि राहुल यांच्यासह सर्व विरोधी पक्षांचे नेते जामिनावर आहेत. हे सर्व रामाच्या विरोधात आहेत. राहुल हे संसद हल्ल्याच्या सूत्रधाराच्या पाठीशी उभे असल्याचे सांगून ते म्हणाले की, हे लोक सनातनविरोधी आहेत. त्यामुळे त्यांना घरी बसवणे आवश्यक आहे.”
नीरज शेखर हे अनुभवी नेते असल्याचे सांगून नड्डा म्हणाले की, ”ते राजकारणात पुढे जातील. ते म्हणाले की, ही निवडणूक केवळ नीरज शेखर यांना खासदार करण्यासाठी नाही. २०४७ पर्यंत विकसित भारताचा मोदींचा संकल्प पूर्ण करण्याची ही निवडणूक आहे. गेल्या १० वर्षांत मोदींनी केवळ भारताचे नशीबच बदलले नाही, तर त्यांनी भारतीय राजकारणाची संस्कृतीही बदलून टाकली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत मजबूत झाला आहे”