INDIA Alliance : इंडिया आघाडी जर सत्तेत आली तर त्यांच्याकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर याबाबत आता सपा आमदाराने खुलासा केला आहे. समाजवादी पक्षाचे कप्तानगंज विधानसभेचे आमदार आणि माजी मंत्री रामप्रसाद चौधरी यांचे पुत्र इंडिया आघाडीचे उमेदवार कविंद्र चौधरी म्हणाले की, ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. यावेळी जनतेने इंडिया आघाडीला सत्तेत आणायचे आहे, असे ठरवले आहे. यावेळी प्रत्येक धर्म आणि जातीचे लोक भाजपवर नाराज आहेत.
इंडिया आघाडीच्या वतीने पीएम चेहऱ्याबाबत सपा आमदार कविंद्र चौधरी म्हणाले की, अखिलेश यादव यासाठी सर्वात योग्य चेहरा आहेत, कारण त्यांनी ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतले आहे आणि त्यांना सरकार चालवण्याचा खूप अनुभव आहे. तसेच ही निवडणूक फक्त विकास आणि खोटे कायदे आणि गुंडगिरीच्या मुद्द्यावर होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
पुढे ते म्हणाले, एकीकडे संविधान वाचवणारे लोक आहेत तर दुसरीकडे संविधान नष्ट करू पाहणारे लोक आहेत. त्यांचे चुलत भाऊ आणि बसपाचे उमेदवार लवकुश पटेल यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर कविंद्र चौधरी म्हणाले की, संविधानात प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि जनतेला सर्व काही समजते की त्यांनी कोणाला मत द्यावे आणि कोणते काम त्यांच्या हिताचे आहे, असेही कविंद्र चौधरी म्हणाले.