Cyclone Remal : बंगालच्या उपसागरात ‘रेमल’ चक्रीवादळ धडकले आहे. या संदर्भात रविवारी बंगालमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला होता. तर या चक्रिवादळामुळे कोलकाता विमानतळ बंद करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) 12 तुकड्या राज्याच्या किनारी भागात तैनात करण्यात आल्या आहेत. नौदल आणि भारतीय तटरक्षक दलही सतर्क आहेत.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेमल चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्वेस 270 किलोमीटर अंतरावर आहे. हे वादळ रविवारी मध्यरात्री बंगालच्या दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील सागर बेट आणि बांगलादेशातील खेउपारा यांच्या दरम्यानच्या किनारी भागातून जाण्याचा अंदाज आहे. त्याच्या प्रभावामुळे बंगालच्या विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.
कोलकात्यासह बंगालच्या विविध जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच आकाश ढगाळ झाले असून जोरदार वारे वाहू लागले आहेत. अधूनमधून पाऊसही पडत आहे. चक्रीवादळाच्या संदर्भात, राज्य सचिवालय, नबन्ना येथे एक नियंत्रण कक्ष उघडण्यात आला आहे. तसेच तेथे मदत साहित्य, अत्यावश्यक औषधे आणि इतर सर्व आवश्यक गोष्टींचा साठा करण्यात आला आहे.
या चक्रीवादळामुळे समुद्रातील मच्छीमारांना 27 मेपर्यंत न जाण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या असून तेथे उपस्थित असलेल्या मच्छीमारांना तातडीने परतण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. दरम्यान, बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये रविवार आणि सोमवारी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बंगालच्या दक्षिण आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांत मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.