Swati Maliwal : आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी बिभव कुमार यांना दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर आज (27 मे) बिभव कुमार यांच्या जामीन अर्जावर तीस हजारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी स्वाती मालीवाल या भावूक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान स्वाती मालीवाल न्यायालयात पोहोचल्या होत्या. तर कोर्टात सुनावणीदरम्यान बिभवच्या वकिलाने सांगितले की, एफआयआर बघा, ही कलमे लागू होतात का? आयपीसीचे कलम 308 तेही असेच लागू केले जाते का? असे सवाल उपस्थित केले.
सुनावणीदरम्यान बिभवच्या वकिलांनी स्वाती मालीवाल यांना अनेक प्रश्न विचारले. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी बोलावल्यावर त्या गेल्या होत्या की नाही हे मालीवाल यांनी सांगितले नाही? त्या परवानगीशिवाय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या, हे कायद्याचे उल्लंघन आहे. अशा प्रकारे कोणी निवासस्थानात प्रवेश करू शकतो का?
स्वाती मालीवाल यांच्या विरोधात आम्ही अतिक्रमणाची तक्रार दाखल केली आहे. कारण हे मुख्यमंत्र्यांचे घर आहे, असे कोणी येऊ शकते का? स्वाती मालीवाल यांना बाहेर थांबण्यास सांगण्यात आले, मात्र तरीही त्या घरात शिरल्या. थांबायला सांगितल्यावर देखील त्यांनी सुरक्षा क्षेत्र ओलांडले आणि आत प्रवेश केला. खासदार असल्यामुळे तुम्हाला काहीही करण्याचा परवाना मिळतो का? असे सवाल बिभव कुमारच्या वकीलांनी स्वाती मालीवाल याना केले. यादरम्यान स्वाती मालीवाल यांना कोर्टातच अश्रू अनावर झाले.