Chhagan Bhujbal : येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे, त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधी राज्यातील राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांकडे मोठी मागणी देखील केली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, महायुतीमध्ये आपल्याला योग्य तो वाटा मिळायला हवा. जेव्हा आपण महायुतीत आलो तेव्हा त्यांनी आपल्याला सांगितलेलं की आपल्याला 80 ते 90 जागा मिळतील. त्यामुळे यावेळी जी खटपट झाली आहे ते पाहता ही खटपट पुढे होता कामा नये, असं छगन भुजबळ अजित पवारांना म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, भाजपने राष्ट्रवादीला विधानसभेमध्ये 80 ते 90 जागा देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे जर भाजपने आपल्याला 80 ते 90 जागा दिल्या तरच आपल्या 50 ते 60 जागा निवडून येतील. पण जर आता तुमच्याकडे 50 आहेत तर मग 50 घ्या असं म्हटलं तर अजून खाली येण्याचं काम होईल. त्यामुळे त्यांना आत्ताच सांगून टाका की आमचा जो वाटा आहे तो आम्हाला मिळायलाच पाहिजे, अशी मागणी भुजबळांनी अजित पवारांकडे केली.