Remal Cyclone : पश्चिम बंगालमध्ये ‘रेमल’ वादळाने धुमाकूळ घातला आहे. ‘रेमल’ वादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बंगालच्या किनारी भागात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच या वादळामुळे 29 हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तर या भागात 2100 हून अधिक झाडे पडली आहेत.
याबाबत राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चक्रीवादळ रेमलमुळे 24 ब्लॉक आणि 79 नगरपालिका प्रभागांमधील 29,500 घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. राज्यातील विविध भागात 2,140 हून अधिक झाडे उन्मळून पडली आणि सुमारे 1,700 विद्युत खांब पडले आहेत. नुकसान झालेल्या घरांपैकी 27,000 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे, तर 2,500 पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याचे प्राथमिक मूल्यांकनातून समोर आले आहे.
प्रशासनाने सतर्कता दाखवत 2,07,060 लोकांना 1,438 सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये हलवले आहे. तसेच सध्या तेथे 77,288 लोक आहेत. तर आता एकूण 341 किचनमधून लोकांपर्यंत अन्न पोहोचवले जात आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
नुकसान झालेल्या भागात काकडद्वीप, नामखाना, सागर द्विप, डायमंड हार्बर, फ्रेजरगंज, बकखली आणि मंदारमणी यांचा समावेश आहे. चक्रीवादळामुळे बंधाऱ्यांना किरकोळ भेगा पडल्या होत्या, त्या तातडीने दुरुस्त करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.