क्रांतीसुर्य, स्वातंत्र्यवीर हिंदू हृदय सम्राट, श्री. विनायक दामोदर सावरकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी योध्दा, निर्भिड सशस्त्र क्रांतिकारक, प्रखर वक्ता, मनस्वी महाकवी, संपूर्ण देशाला प्रेरक इतिहास लेखक , प्रगल्भ कादंबरीकार , अमर गीत लेखक , धेय्यवादी नाटककार, भाषा प्रभू , मराठी नव शब्दांचा निर्माता , द्रष्टा विचारवंत, स्वयंभू नेता, हिंदुत्व विचार मार्गदर्शक , हिंदूराष्ट्र उद्गाता , पुरोगामी हिंदू विचारवंत, बंडखोर समाजसुधारक, चाळीसहून अधिक मराठी व इंग्रजी ग्रंथांचा लेखक, व्यासंगी अभ्यासक , स्वतंत्र भारताचे लष्कर , अर्थशास्त्र , राजकारण, परदेश निती यांचा उद्गाता, हिंदू मुस्लिम द्विराष्ट्रवादाचा समर्थक, अस्पृश्यता निर्मूलन प्रणेता, जातीवाद व अंधश्रध्दा निवारक, तर्कनिष्ठ राष्ट्रीय हिंदुत्व विचार दार्शनिक, क्रांतिकारकांचा गुरु व मार्गदर्शक, स्वदेशी चळवळीचा सक्रिय नेता, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष, अभिनव भारत संघाचा संघटक, व्यासंगी ललित लेखक, निर्भिड संपादक, कुटुंब वत्सल पिता, पती, बंधू, दीर, निरपेक्ष राजकारणी, संन्यस्त उत्तर आयुष्य जगून प्रायोपवेशन करुन मृत्युला सामोरा जाणारा ऋषितुल्य महामानव, म्हणजे वि.दा.सावरकर . प्रज्वलित अग्निहोत्र जणू !! आधुनिक दधिची ऋषी !!
” विनायक ” हे नाव भारतीय संस्कृतीचे संपूर्ण द्योतक आहे. आपले लाडके दैवत श्री गणेशाचे हे नाव आहे .गणेश पूजनाने आणि श्री गणेश स्तवन करूनच कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ होतो. तद्वत, आपल्या आराध्य दैवत अशा भारतमातेच्या स्वातंत्र्य लढ्याचे स्तवन ” विनायक सावरकर ” यांचे स्मरण केल्याशिवाय होऊच शकत नाही एवढे त्यांचे उत्तुंग राष्ट्र कार्य आहे . ” वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम् l” असे तन मन धन अर्पून राष्ट्र कार्य करणारे स्वातंत्र्य सैनिक म्हणत असतात. ते स्वातंत्र्याचे , हिंदुत्वाचे प्रखर मंत्र आणि तंत्र आपल्याला देणारा , बुद्धिवादी , प्रतापी ऋषी म्हणजे विनायक दामोदर सावरकर !!
” स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवीनच .” अशी वेदोक्त गर्जना करणारे , लोकमान्य टिळक यांच्या मुशीतून घडलेले सावरकर हे स्वातंत्र्य विचाराचे वाहक बनले ! विनायक याचा एक अर्थ ” वाहून नेणारा “असाही आहे. तो या विनायकाने सार्थ ठरवला !!
विनायक याचा अर्थ ” मार्गदर्शक ” असाही आहे .
वयाच्या अकराव्या वर्षा पासून विनायकराव सावरकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मरेपर्यंत झुंजत राहण्याची मित्रांसह प्रतिज्ञा घेतली होती. ती आजन्म पाळली. मदनलाल धिंग्रा, कान्हेरे सारखे स्वातंत्र्यासाठी जीव ओवाळून टाकणारे अनेक क्रांतिकारी त्यांनी घडवले . त्यांच्या धगधगत्या लेखनाने हजारो , लाखो भारतीय युवकांची मने आणि मनगटे प्रस्फुरीत झाली.
विनायक नावाचा एक अर्थ आहे “वाटाड्या “!! ..भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा ” वेद ” म्हणता येईल असे, सावरकरांचा “अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर ” हा ग्रंथ इंग्लंड आणि भारतातील क्रांतिकारकांसाठी गुप्तपणे स्वातंत्र्य लढ्याचा वाटाड्या झाला होता . स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर , तोच ग्रंथ भारत राष्ट्र संघटित व जागरूक ठेवण्यासाठी राष्ट्रवादाचा ” महामार्ग ” सिद्ध झाला. विविधतेतील राष्ट्रीय एकत्व त्यातून जगासमोर आले. हा ग्रंथ मुळात युवा विनायक सावरकरांनी ब्रिटनमध्ये कायद्याचे शिक्षण घेता घेता लिहिला . इंग्लिश मध्ये भाषांतर करुन प्रसारित केला. त्याच्या पारायणाने अगणित क्रांतिकारक घडले. अठराशे सत्तावनच्या लढ्याला ब्रिटिशांनी शिपायांच्या कथित बंडाचा शिक्का मारुन कमी लेखले होते. त्या हिंदुस्थानी क्रांतिकारकांच्या लढ्याला आणि बलिदानाला “१८५७ चे स्वातंत्र्य समर ” नावाचा ग्रंथ लिहून , याच विनायकाने गौरविले. आज तो ग्रंथ आमचा गौरवाचा इतिहास म्हणून सर्वांना प्रेरणा देत आहे आणि पुढेही देत राहील.
ब्रिटनमध्ये सशस्त्र क्रांतिकारक म्हणून पकडले गेल्यावर श्री विनायक दामोदर सावरकर यांना संशयित म्हणून कडक तपासणीला सामोरे जावे लागले . त्यांच्याकडे काही शस्त्र सापडले नाही. त्यांना ब्रिटिश सैनिकाने खिजवले. तेंव्हा सावरकरांनी आपल्या खिशातील पेन दाखवून त्या सैनिकाला बेडरपणे प्रत्युत्तर दिले. ” तुम्ही जे शस्त्र शोधताय ते ही लेखणी आहे . ती तुम्ही जप्त नाही केली . माझे खरे शस्त्र तर ही लेखणी आहे “ हे लेखणीचे शस्त्र तुम्ही हिसकावून घेऊ शकत नाही या लेखणीने मी लढेन आणि खरेच त्यांची लेखणी ही ब्रिटिशांच्या बंदुका, तोफा, बॉम्ब , छळछावण्या यापेक्षा प्रभावी शस्त्र ठरली हे इतिहास सांगतो.
इदं शस्त्रम इदम शास्त्रम !! ही त्यांची बाणेदार वृत्ती होती. त्या लेखणीने ब्रिटिश साम्राज्याच्या पायाखाली स्वराज्याचा सुरुंग यशस्वीपणे पेरून, त्यांचे साम्राज्य सावरकरांनी लेखणीने खीळखिळे केले. त्यांनी लेखणीने स्वराज्याची ज्योत भारतीय मनामनात पेटवली .
विवेक प्रभाकर सिन्नरकर
सौजन्य- विश्व संवाद केंद्र,पुणे