लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे टप्पे संपत आले आहेत. ६ टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. ७ व्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुमका येथे भाजपा उमेदवार सीता सोरेन यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी नक्षलग्रस्त भागात घुसखोरांना आश्रय दिल्याचा आरोप इंडिया आघाडीवर केला आहे. तसेच त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षावर देखील निशाणा साधला आहे.
या सभेत बोलताना मोदींनी झारखंड मुक्ती मोर्चावर हल्ला बोल्ट केला. मोदी म्हणाले, ”झारखंडमध्ये घुसखोरांची समस्या मोठी समस्या म्हणून निर्माण झाली आहे. परिणामी, अनेक भागात आदिवासींची संख्या झपाट्याने कमी होत आहे आणि घुसखोरांची संख्या वाढत आहे. यामुळे आदिवासींच्या मुलींचा जीव धोक्यात आला आहे.”
पुढे बोलताना मोदी म्हणाले, ”इंडिया आघाडी तुष्टीकरणाच्या राजकारण करत आहे. ते घुसखोरांना, दहशतवाद्यांना संरक्षण देतात. तसेच त्यांच्या धोरणाला जो कोणी विरोध करतो त्याच्यावर ते हिंदू -मुस्लिम विभाजनाचा आरोप करतात. भाजप दलित आणि उपेक्षित समाजासाठी काम करण्यास कटिबद्ध आहे.”