Sonia Duhan : लोकसभा निवडणुका सुरू असतानाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच त्यांनी पक्ष सोडत खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोपही केले आहे. सेल्फी काढून पक्ष चालत नाही, असं म्हणत सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सोनिया दुहान म्हणाल्या, मी पक्ष आणि शरद पवार यांना सोडलेले नाही. अशा अफवा कोण पसरवत आहे हे माहिती नाही. सोबतच मी अजितदादांच्या पक्षातही गेलेले नाही. तसेच शरद पवारांशी अनेक दशके जोडलेले नेते पक्ष का सोडत आहेत याचा विचार सुप्रिया सुळेंनी करावा. कारण पक्षामध्ये काहीही सुरळीत चाललेलं नसून सुप्रिया सुळेंमुळे मला पक्ष सोडावा लागत आहे, अशी टीका दुहान यांनी केली.
आपण कोणत्याही गोष्टीला कितीही दुर्लक्ष केलं तरी ती गोष्ट एक दिवस बाहेर येतेच. त्यामुळे माझा आज संयम संपला. मी शरद पवारांशी बोलले देखील आहे. त्यांनी मला समजून सांगितले, आमची बैठकही होणार होती. 22 तारखेला माझी शरद पवारांसोबत चर्चा झाली होती. पण दुसऱ्या दिवशी मला सुप्रिया सुळेंचा फोन आला आणि त्या माझ्याशी ज्या पद्धतीने बोलल्या ते एकूण मला पक्षामध्ये राहायचे नाहीये, असं सोनिया दुहान म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, सेल्फी काढून कोणताही पक्ष चालत नाही. सर्वांना पक्षाच्या नियमानुसार चालावे लागते. ही गोष्टी सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या नेत्यांना समजून घ्यावी लागेल. तसेच मी सुप्रिया सुळेंमुळे पक्ष सोडत आहे, असंही सोनिया दुहान म्हणाल्या.