PM Modi On INDIA Alliance : पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेसने भ्रष्टाचारात दुहेरी पीएचडी केल्याचे दिसते, अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी केली आहे.
विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, ते इथे समोरासमोर लढण्याचे नाटक करत आहेत, दिल्लीत ते एकत्र निवडणूक लढवत होते आणि या खोट्या पक्षाचे पहिले सरकार दिल्लीत काँग्रेसच्या पाठिंब्याने बनले होते हे लोक विसरले नाहीत. त्यामुळे त्यांनी भ्रष्टाचाराची जननी काँग्रेसकडून भ्रष्टाचाराचे धडे घेतले आहेत. भ्रष्टाचाराची जननी असलेल्या काँग्रेसच्या कुशीतून हे कट्टर भ्रष्ट लोक जन्माला आले आहेत. तसेच पंजाब अंमली पदार्थांपासून मुक्त करू असे हे लोक म्हणायचे. पण त्यांनी तर ड्रग्ज हे आपल्या कमाईचे साधन बनवले. दिल्लीतील दारू घोटाळा संपूर्ण जगाला माहीत आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली.
दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे आरक्षण कुणालाही हिसकावून घेऊ देणार नाही, अशी शपथ मोदींनी घेतली आहे. माझ्या या प्रयत्नामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे सदस्य नाराज आहेत. एससी-एसटी, ओबीसींचे आरक्षण हिरावून घेण्याचा त्यांचा संपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड आहे. ते संविधानाच्या भावनेचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्म्याचा अपमान करत आहेत. त्यांना दलित आणि मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकावून फक्त मुस्लिमांना द्यायचे आहे. मोदींनी त्यांचा सर्वात मोठा कट उघड केला आहे. त्यामुळे ते संतापले आहेत आणि मोदींवर सतत टीका करत आहेत, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, भाजप ‘वारसा आणि विकास’ हा मंत्र पाळत आहे. जेव्हा अफगाणिस्तानात संकट आले तेव्हा आमचे शीख बंधू-भगिनी तिथे राहत होते. तिथे आमचा गुरुद्वारा होता, जेव्हा धोका निर्माण झाला तेव्हा आम्ही गुरू ग्रंथसाहिबच्या प्रतिमा आपल्या माथ्यावर ठेवून आदराने भारतात आणल्या. एवढेच नाही तर साहिबजादांच्या बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी आम्ही 26 डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा करण्याचे ठरवले आहे. भारताच्या भावी पिढीला प्रेरणा देण्यासाठी आम्ही वीर बाल दिवस सुरू केला आहे. मी सध्या गप्प बसलो आहे, ज्या दिवशी मी तोंड उघडेल त्यादिवशी तुमच्या सात पिढ्यांचा हिशोब बाहेर काढेल, असा इशाराही मोदींनी विरोधकांना दिला.