Prajwal Revanna ; लैंगिक शोषणाचा आरोप असलेले जेडीएसचे निलंबित खासदार प्रज्वल रेवन्ना यांना पोलिसांनी शुक्रवारी (31 मे) सकाळी बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आहे. कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) प्रज्वल रेवन्ना भारतात येत असल्याची माहिती मिळताच कर्नाटक पोलीस इमिग्रेशन अधिकाऱ्यासह विमानतळावर पोहोचले. तर रेवण्णाला आजच न्यायालयात हजर करता येणार आहे.
सध्या प्रज्वल रेवन्नाला बेंगळुरू येथील सीआयडी कार्यालयात आणण्यात आले असून, सीआयडी कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जेडीएसचे निलंबित खासदार प्रज्वल रेवन्ना याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. तसंच रेवन्नावर महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचाही आरोप आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रज्वल रेवण्णाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर तो जर्मनीला पळून गेला होता. आता तो एसआयटीच्या ताब्यात आहे. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत त्याची चौकशी केली जाणार आहे. वैद्यकीय चाचणीही केली जाईल.
गुरुवारी (३० मे) प्रज्वल रेवण्णाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून भारतात परतल्याची माहिती दिली होती. त्यानंतरच कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) प्रज्वल रेवण्णाला अटक केली.