सध्या देशातील अनेक भागात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. भीषण टंचाई जाणवत आहे. देशाची राजधानी दिल्लीत देखील पाण्याची मोठी टंचाई असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. सध्या देशात तीव्र उष्णता आणि उष्णतेची लाट हाहाकार माजवत आहे. वाढत्या उष्मा आणि उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहार आणि यूपीमध्ये सर्वाधिक उष्णतेची लाट जाणवत आहे. बिहारमधील १२ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे ६५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये २५० हून अधिक लोक दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. राजधानी पाटणासह संपूर्ण बिहार उष्णतेने त्रस्त आहे.
बिहारशिवाय यूपीमध्येही लोक उष्णतेने हैराण झाले आहेत. यूपीमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत एकूण १६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केवळ वाराणसी आणि आसपासच्या भागातच उष्मा आणि लाटेमुळे ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेमुळे लोकांचे हाल झाले आहेत.