लोकसभा निवडणुकीसाठी उद्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. ४
जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी आणि
महायुतीमध्ये उद्योगांचे स्थलांतर या मुद्द्यावर सतत आरोप-प्रत्यारोप होताना दिसत
आहे. राज्यातील उद्योग बाहेर जात असे असा आरोप विरोधक करतात तर, राज्यात
परकीय गुंतवणूक वाढत असे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र परकीय
गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकांवर आहे असे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया
प्लॅटफॉर्मवर राज्यातील गुंतवणुकीची आकडेवारी जाहीर केली आहे. यात ते म्हणतात,
”बोलायला
नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते…थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र
सलग दुसर्या वर्षी क्रमांक 1 वर !एफडीआय आकर्षित करण्यात
महाराष्ट्र 2022-23 मध्ये क्रमांक 1 वर राहिल्यानंतर आता 2023-24 या
आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने
काल 30 मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने
गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केली आहे.
2022-23 या आर्थिक वर्षांत: ₹
1,18,422 कोटी
2023-24 या आर्थिक वर्षांत: ₹
1,25,101 कोटी
या आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण
गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे, तर दुसर्या क्रमांकावरील गुजरात आणि
तिसर्या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे.महाविकास
आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग
दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आहे.महाराष्ट्रातील जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो.”
आता फडणवीसांनी जाहीर केलेल्या
आकडेवारीवर विरोधक काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची
शक्यता आहे.