सलमान खानच्या कारवर पनवेलमध्ये हल्ला करण्याचा कट लॉरेन्स बिश्नोई गँगने रचला होता. मात्र, नवी मुंबई पोलिसांनी त्यांचा हा कट उधळून लावला असून या प्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी बिश्नोई गँगच्या संपर्कात आल्याची माहिती मिळते आहे.
नवी मुंबई पोलिसांनी आज, शनिवारी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील ४ शूटर्सना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघेही पनवेलमध्ये सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याचा कट रचत होते. रिपोर्टनुसार, पाकिस्तानकडून शस्त्रे आयात करण्याची योजनाही आखली जात होती. या शूटर्सना सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसजवळ अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी या कटाचा भंडाफोड केला आहे.
या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई, संपत नेहरा, गोल्डी ब्रार यांच्यासह १७ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत धनंजय उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ न्हवी, वास्पी खान उर्फ वसीम चिकना आणि रिजवान खान उर्फ जावेद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चौघेही रात्री उशिरा रेकी करत होते. लॉरेन्स बिश्नोई टोळीचे काही लोक पनवेलमध्ये असून ते सलमान खानच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. पाकिस्तानी पुरवठादारांशी ३ प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे सौदे करण्यात आल्याचेही समोर आले आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने संपूर्ण नियोजन केले होते. सलमान खानवर धोकादायक शस्त्रांनी हल्ला करण्याची योजना होती. हा हल्ला त्याच्या फार्म हाऊसजवळ करण्याचा कट रचण्यात आला होता.
यापूर्वी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या घराबाहेर १४ एप्रिल २०२४ रोजी मोटारसायकलस्वारांनी गोळीबार केला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी त्यांची नावे होती. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित अनुज थापनला पंजाबमधून अटक करण्यात आली. यानंतर 1 मे रोजी मुंबई पोलिस कोठडीत थापनचा मृत्यू झाला होता.