एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोलनुसार भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना धक्का बसू शकतो. कारण पोलनुसार साताऱ्यात शरद पवार गटाचे मविआचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. तर भाजप उमेदवार उदयनराजे भोसले पिछाडीवर असल्याचं दिसत आहे.
बारामतीमध्ये एक्झिट पोलनुसार अजित पवारांना धक्का बसू शकतो. पोलनुसार सुप्रिया सुळे आघाडीवर असून सुनेत्रा पवार पिछाडीवर असल्याचं दिसत आहे.
सिंधुदुर्गात एक्झिट पोलनुसार भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे आघाडीवर आहेत. तर ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत पिछाडीवर आहेत.
सोलापूरमध्ये पोलनुसार काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. तर भाजप उमेदवार राम सातपुते हे पिछाडीवर आहेत. तसेच माढ्यात शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर पिछाडीवर आहेत.
पोलनुसार उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर असून भाजपचे उज्ज्वल निकम पिछाडीवर आहेत. तर बीडमध्ये पोलनुसार पंकजा मुंडे आघाडीवर आहेत तर शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे पिछाडीवर आहेत.
मुंबईत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये सहाच्या सहा जिंकणार असल्याचा दावा केला जात आहे. तर ठाकरे गटाच्या उमेदवार सुषमा अंधारेंनी सहा पैकी चार ठाकरे गट आणि एक जागा काँग्रेस जिंकेल असा दावा केला आहे.