जपानच्या इशिकावा प्रांतातील नोटो पेनिन्सुला भागात सोमवारी सकाळी ६.३१ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.9 इतकी नोंदवण्यात आल्याचे जपानच्या हवामान संस्थेने म्हटले आहे. भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरून घराबाहेर पडले आहेत .नोटो शहर, नानाओ आणि अनामिझू शहराव्यतिरिक्त, निगाटा प्रांतातील काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पण आतापर्यंत अधिकाऱ्यांनी सुनामीच्या कोणत्याही धोक्याची पुष्टी केलेली नाही.
जपानचे प्रमुख वृत्तपत्र जपान टाईम्सने आपल्या अहवालात याबाबत सविस्तर चर्चा केली आहे.अहवालात हवामान संस्थेच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाच महिन्यांपूर्वीही शक्तिशाली भूकंप झाला होता. तेव्हा मोठे नुकसान झाले होते. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, आजच्या भूकंपाने नोटो प्रायद्वीपच्या उत्तरेकडील टोकाजवळील वाजिमा आणि सुझू या शहरांना मोठा धक्का बसला आहे .
टोकियो इलेक्ट्रिक पॉवरच्या म्हणण्यानुसार, काशीवाझाकी शहर आणि निगाता प्रांतातील कारिवा गावात स्थित काशीवाजाकी-कारीवा अणुऊर्जा प्रकल्पावर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र वीज खंडित झाल्यामुळे जोएत्सु आणि होकुरिकू शिंकानसेन बुलेट ट्रेन सेवा तात्पुरती थांबवण्यात आल्याचे पूर्व जपान रेल्वे कंपनीने सांगितले. भूकंपामुळे दुर्गम कांटो प्रदेशात स्मार्टफोनवर विशेष पूर्व चेतावणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. निगाटा, फुकुशिमा आणि तोयामा प्रांतांसह काही ठिकाणी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. .