पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळासाठीच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता शपथविधी सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रपती भवनमध्ये संपन्न होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांचे प्रमुख उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर या शपथविधीसाठी सफाई कर्मचारी, तृतीयपंथी आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांना विशेष आमंत्रण देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच वंदे भारत आणि मेट्रो प्रकल्पासाठी काम करणारे रेल्वे कर्मचारी, केंद्रीय योजनांचे लाभार्थी आणि ‘विकसित भारत’ कार्यक्रमाचे ॲम्बेसेडर यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले जाणार आहे.
राष्ट्रपती भवनात ८००० पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. एनडीएमधील घटक पक्षांच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांना एनडीएचा नेता म्हणून निवडल्यानंतर शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. या सोहळ्याला दक्षिण आशियाई देशातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. तसेच नेपाळचे पंतप्रधान पुष्पा कमल दहल प्रचंड, भुटानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि मॉरिशसनचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथही या सोहळ्यासाठी देशात पोचणार आहेत .
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्या टर्ममध्ये शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे तिसरे पंतप्रधान ठरणार आहेत.