रविवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका बसवर मोठा हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर अचानक हल्ला केला आणि गोळीबार केला, त्यामुळे बस दरीत गेली आणि तीन महिलांसह 10 जणांचा मृत्यू झाला, तर 33 जण जखमी झाले आहेत. तर सध्या या दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे.
या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप मुलांना आपला जीव गमवावा लागला. तर या हल्ल्यानंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. तसेच स्थानिक पोलीस प्रशासन आणि निमलष्करी दलाकडूनही शोधमोहीम राबवली जात आहे.
भाविकांवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याबाबत देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यामध्ये आता प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने दहशतवाद्यांना सडेतोड इशारा दिला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासोबतच दहशतवाद्यांचा हिशेब इथेच होणार आहे, असं कपिल शर्माने म्हटलं आहे.
मी रियासी येथील यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. जे निष्पाप लोकांवर गोळीबार करतात त्यांना आयुष्यात कधीही शांती मिळणार नाही. येथे सर्व गोष्टींचा हिशेब घेतला जाईल, असं कपिल शर्मा म्हणाला.
https://x.com/KapilSharmaK9/status/1800106338548375712
दरम्यान, या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. भारतीय लष्कराकडून जंगल परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.