नुकताच भारतीय जनता पक्षाच्या ओडिशा सरकारने जगन्नाथ धामबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आज (13 जून) जगन्नाथ पुरी मंदिराचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव एक दिवस आधी मांडण्यात आला होता, त्याला आज सकाळी मंजुरी देण्यात आली.
विशेष म्हणजे भाजपने ओडिशा विधानसभा निवडणुकीपूर्वी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे आश्वासन दिले होते.
आज सकाळी ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी मंदिरात प्रार्थना केली. यावेळी भाजप खासदार संबित पात्रा, प्रतापचंद्र सारंगी यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. तर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मंदिराचे सर्व दरवाजे उघडल्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले, काल आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आज सकाळी 6.30 वाजता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मी माझ्या आमदार आणि पुरीच्या खासदारांसोबत मंगला आरतीला गेलो होतो. जगन्नाथ मंदिराच्या विकासासह अन्य कामांसाठीही आम्ही मंत्रिमंडळात निधी प्रस्तावित केला आहे. पुढील अर्थसंकल्प सादर करताना मंदिर व्यवस्थापनासाठी 500 कोटी रुपयांचा निधी देऊ.
दरम्यान, ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने मंदिराचे सर्व दरवाजे उघडण्याचे आश्वासन दिले होते. तर बिजू जनता दल प्रशासनाने कोविड महामारीपासून मंदिराचे चार बंद दरवाजे उघडले नव्हते. त्यामुळे भाविकांचा प्रवेश एकाच दरवाजातून होत होता. तर काल सीएम माझी यांनी मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याबाबत भाष्य केले होते. ते बुधवारी म्हणाले होते, राज्य सरकारने पुरी जगन्नाथ मंदिर उद्या सकाळी सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. आता चारही दरवाजातून भाविकांना जाता येणार आहे.