वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने राज्य सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विहिंप नेते लवकरच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची याप्रकरणी भेट घेणार आहे. भाजप शिवसेनेच्या राज्य सरकारला हिंदुत्वाचा वारसदार म्हणावे की नाही? हिंदुत्वाचा वारसा सांगणाऱ्या सरकारने वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्याचा निर्णय करणे दुर्दैवी आहे. हिंदू समाजाने हे केव्हापर्यंत सहन करावे, असा सवाल विहिंपने उपस्थित केला आहे.
राज्यातील ’वक्फ’ मंडळाचे बळकटीकरण करण्यासाठी सरकारने 10 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. त्यापैकी 2 कोटी रुपये 10 जूनला वितरीत केल्याचा शासन आदेश अल्पसंख्यांक विकास विभागाने काढला असल्याचे समोर येत आहे.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या खर्चाचा विनियोग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येत्या आर्थिक वर्षात हा निधी ‘वक्फ’ मंडळाला देण्यात येणार असल्याचे अल्पसंख्याक विकास विभागानं म्हटले आहे. आता या सगळ्या नंतर सरकारच्या या निर्णयाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिले जात आहे. विश्व हिंदू परिषदेने राज्य सरकार वक्फ बोर्डाचे तुष्टीकरण करत असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
“राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून हिंदुत्वचा वारसा घेऊन चालणारे सरकार जर अशी कारवाई करणार असेल, तर त्यांना हिंदुत्वाचे वारसदार म्हणावे की नाही असा प्रश्न जनतेसमोर निर्माण होत असल्याची तीव्र भावना विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र-गोवा प्रांत महामंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केली आहे.”
वक्फ मंडळाचे बळकटीकरण करण्याच्या निर्णयाचा महायुतीने पुनर्विचार करावा. वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी सरकारने घोषित केलेला १० कोटी रुपयांचा निधी रहित करावा अन्यथा येत्या विधानसभेच्या निवडणुकीत हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणीही विश्व हिंदु परिषदेने शिवसेना आणि भाजप यांच्या महायुतीला दिली आहे.