उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आहेत. संवाद आणि समन्वय निर्माण करून जनतेचा विश्वास जिंकला पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच प्रकल्पांबाबत लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्यांचे मार्गदर्शन घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. सोबतच बकरी ईदच्या तयारीवर चर्चा करताना त्यांनी रस्त्यावर नमाज अदा करू नये आणि कोणत्याही परिस्थितीत बंदी असलेल्या जनावरांची कत्तल केल्यास कारवाई केली पाहिजे, असे सांगितले.
16 जून रोजी गंगा दसरा, 17 जूनला बकरीद, 18 जून रोजी ज्येष्ठ महिन्यातील मंगळ आणि 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन, तर जुलैमध्ये मोहरम, कंवर यात्रा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. यासाठी शासन आणि प्रशासनाने 24 तास सतर्क राहण्याची गरज असल्याचं योगी म्हणाले. तर या कार्यक्रमांसाठी 15 ते 22 जून या कालावधीत राज्यात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. गंगा दसऱ्याच्या निमित्ताने गंगा नदीचे घाट स्वच्छ करून सजवावेत, असा सूचना योगींनी अधिकाऱ्यांना दिल्या.
तर परंपरेनुसार ठरवून दिलेल्या ठिकाणी नमाज अदा करावी. रस्ते अडवून नमाज पढू नये. श्रद्धेचा आदर करा पण नवीन परंपरेला प्रोत्साहन देऊ नका. व्हिडिओग्राफी करून ड्रोनचा वापर करावा. शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करावी, असेही मुख्यमंत्री योगी म्हणाले.