छत्तीसगडमधील अबुझमद येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 8 माओवादी ठार झाले आहेत. तर या चकमकीत कर्तव्य बजावताना एक जवानही शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत.
पीटीआयच्या वृत्तानुसार, कांकेर, दंतेवाडा, नारायणपूर आणि कोंडागाव या चार जिल्ह्यांतील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर गेले असताना आज सकाळी अबुझमद जंगलात ही चकमक झाली.
सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच आहे. जिल्हा राखीव रक्षक (DRG), स्पेशल टास्क फोर्स (STF) आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) च्या 53 व्या बटालियनचा चार जिल्ह्यांतील जवानांचा समावेश असलेले ऑपरेशन 12 जून रोजी सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, अबुझमद हे नारायणपूर, विजापूर जिल्हा आणि दंतेवाडा जिल्ह्यात मोडणारे डोंगरी वनक्षेत्र आहे. हे 4000 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. भौगोलिकदृष्ट्या अलिप्त आणि मोठ्या प्रमाणात दुर्गम, हा भाग माओवादी कारवायांचा गड मानला जातो.