लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणूकीसाठी रणशिंग फुंकले आहे. महाविकास आघाडीने एकत्रित पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज (15 जून) महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याची घोषणा केली आहे.
आज झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड, अनिल देसाई, वंदना चव्हाण, अरविंद सांवत हे नेते उपस्थित होते.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आज तीन पक्षांची प्राथमिक बैठक झाली. विधानसभेची पूर्वतयारीच्या अनुषंगाने ही बैठक होती. आम्ही लोकसभेसाठी ज्या पद्धतीने लढलो त्यापेक्षा अधिक ताकदीने आम्ही लोकांचे प्रश्न मांडून विधानसभेमध्येही बदल करू, असा विश्वास चव्हाणांनी व्यक्त केला.
ही पत्रकार परिषद महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी आहे. महाराष्ट्रातील जनतेने लोकशाही वाचवण्यासाठी घवघवीत यश महाविकास आघाडीला मिळवून दिले. तसेच आम्ही प्रचंड धनशक्ती विरोधात ही निवडणूक लढवली आणि य़श मिळवलं आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.