आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मोठे पाऊल उचलले आहे. एका महिलेला 5 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि मासिक 10,000 रुपये पेन्शन देण्याची घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. वायएसआरसीपी सरकारच्या काळात या महिलेचा छळ झाल्याचा दावा टीडीपीने केला आहे.
अरुधरा या महिलेने तिची मुलगी सैलक्ष्मी चंद्रासोबत शुक्रवारी राज्य सचिवालयात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली. टीडीपीने जारी केलेल्या निवेदनानुसार, तिने चंद्राबाबू नायडू यांना वायएसआरसीपी सरकारने तिचा कसा छळ केला आणि तिची मुलगी मणक्याच्या गंभीर समस्यांनी ग्रस्त असल्याचे सांगितले. तसेच वायएसआरसीपीच्या स्थानिक नेत्यांनी निर्माण केलेल्या समस्यांची माहिती या महिलेने मुख्यमंत्र्यांना दिली.
तसेच टीडीपीच्या निवेदनानुसार, चंद्राबाबू नायडू यांनी आता संबंधित महिलेला आश्वासन दिले की, राज्य सरकार त्यांना त्यांच्या मालमत्तेसंदर्भातील कायदेशीर बाबींमध्ये मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. तसेच चंद्राबाबू नायडू यांनी त्यांचे सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासनही त्या महिलेला दिले.